पुणे : दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड रोखण्यासाठी यंदा प्रायोगिक तत्त्वावर अभिनव उपाय करण्यात आला. पुणे विभागातील बारामती येथे प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी डिजिटल ट्रंकेचा उपयोग करण्यात आला. पहिला प्रयोग यशस्वी ठरला असून, आता दहावीच्या परीक्षेतही डिजिटल ट्रंक वापरली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यभरातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर बारावीची परीक्षा मंगळवारी (१० फेब्रुवारी) सुरू झाली. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १२ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यात परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, बैठे पथक, आकस्मिक भेटी, ड्रोनद्वारे देखरेख, सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल अशा उपाययोजनांचा समावेश आहे. याशिवाय कस्टडी ते परीक्षा केंद्र या वाहतुकीदरम्यान प्रश्नपत्रिकांमध्ये होऊ शकणारी छेडछाड रोखण्यासाठी यंदा पहिल्यांदाच ‘जीपीएस एनेबल्ड डिजिटल लॉक विथ ट्रंक’ वापरण्यात आली.

डिजिटल ट्रंकेबाबत माहिती देताना पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे म्हणाले, ‘बारामती येथील १२ परीक्षा केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल ट्रंकचा वापर करण्यात आला. या जिओ टॅगिंग असलेल्या ट्रंकेला डिजिटल लॉकप्रणाली आहे. त्यामुळे नोंदवलेल्या वेळेनुसारच ही ट्रंक उघडते. अन्य वेळी ट्रंक उघडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला मिळते. तसेच जिओ टॅगिंगमुळे ट्रंकेचा प्रवास नियोजित मार्गानुसारच होत आहे की नाही यावर देखरेख ठेवता येते. त्यानुसार बारावीच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर कस्टडीतून १२ परीक्षा केंद्रांवर डिजिटल ट्रंकेतून पाठवण्यात आल्या. या ट्रंकेच्या वापराची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. आता दहावीच्या परीक्षेवेळीही पुन्हा एकदा प्रायोगिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर अधिक व्यापक स्तरावर या ट्रंकेचा वापर करण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून घेतला जाईल.

जीपीएसचाही वापर

प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचवणाऱ्या अभिरक्षकाच्या (रनर) मोबाइलमधील जीपीएस सुरू ठेवण्याची पद्धतही वापरण्यात येते. त्यामुळे अभिरक्षक नियोजित मार्गानुसार जातो आहे का, वाटेत कुठे थांबला आहे का ते पाहता येते. मात्र, प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्याची सुविधा त्यात नव्हती, असेही उकिरडे यांनी सांगितले.