पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकारांप्रकरणी केलेल्या कारवाईने शतक गाठले आहे. आतापर्यंत १०३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, सर्वाधिक कारवाई अमरावती विभागीय मंडळाअंतर्गत करण्यात आली आहे.
राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. तसेच, राज्य मंडळाकडून परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीसह भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, बैठी पथके, आकस्मिक भेटी, विभागीय मंडळांकडून भरारी पथके अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतरही बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, परीक्षार्थ्यांकडे मोबाइल सापडणे असे प्रकार उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर, गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी तातडीने कठोर भूमिका घेऊन गैरप्रकारांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील प्रकरणात १७, कुर्ला तालुक्यातील यशवंत विद्यालय प्रकरणात एक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रकरणात २१, जालना जिल्ह्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांतील गैरप्रकारांमध्ये मिळून पाच, जुमडा फाटा येथील प्रकरणात तीन शाळांतील मिळून २८, गडचिरोली येथील बोमनवार विद्यालयातील गैरप्रकारप्रकरणी चार, नांदेड जिल्ह्यातील बेटमोगरा येथील प्रकरणात दोन, तर धाराशिव जिल्ह्यातील सलगरा येथील प्रकरणात तीन, वाशिम येथील आप्पास्वामी विद्यालय शेदूर्जाना आढाव केंद्र येथील गैरप्रकारात तीन, आदिवासी आश्रमशाळा रुईगोस्ता केंद्र येथील प्रकरणात ५, वसंतराव नाईक विद्यालय किन्ही राजा येथील प्रकरणात तीन, ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा केंद्र येथील प्रकरणात ७, बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथील प्रकरणात तीन, तर शेषराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय लेहणी येथी दोन अशा एकूण १०३ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्र संचालक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, परीरक्षक, शिपाई आदींचा समावेश आहे.
विभागीय मंडळनिहाय निलंबन कारवाई
- अमरावती – ५०
- छत्रपती संभाजीनगर – ४४
- लातूर – ५
- नागपूर – ४
दहावी-बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांसंदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागणारे ही भूषणावह बाब नाही. मात्र, परीक्षांची विश्वासार्हता, गोपनीयता, संवेदनशीलता आणि पारदर्शकता जपण्यासाठी राज्य मंडळाला, पर्यायाने शासनाला कारवाईची करावी लागली. या परीक्षांतील गैरप्रकारांबाबत राज्य मंडळाची ‘झिरो टॉलरन्स’ ही भूमिका राहणार आहे. – डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ
