पुणे : नीट पेपरफुटीमुळे देशभरात परीक्षांच्या विश्वासार्हतेविषयी शंकेचे वातावरण निर्माण झालेले असताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) आता दहावी-बारावीच्या परीक्षांची गोपनीयता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणारे पाऊल टाकत आहे. येत्या पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर एका विषयाची प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रावर पाठवणे, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचे राज्य मंडळाच्या विचाराधीन आहे.

राज्य मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत बारामती येथे डिजिटल ट्रंकचा वापर करून प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. आता त्यापुढे पाऊल टाकण्याचे नियोजन राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. त्याची चाचणी जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत घेतली जाणार आहे.

राज्य मंडळाच्या नियोजनानुसार, पुुरवणी परीक्षेत प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात थेट केंद्रावर पाठवल्या जातील. त्यामुळे प्रचलित पद्धतीतील प्रश्नपत्रिकांची वाहतूक हा भाग कमी होऊ शकेल. डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठविण्याची यंत्रणा राज्य मंडळाकडून विकसित करण्यात येत आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करून घेतले जाणार आहे. त्याचा उपयोग ‘ऑनस्क्रीन’ मूल्यमापन करण्यासाठी होईल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली जाणार आहे.

यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेमध्ये ऑनस्क्रीन मूल्यांकन पद्धतीचा वापर केला होता. तसेच, काही विद्यापीठांच्या स्तरावरही त्याचे प्रयोग सुरू आहेत. राज्य मंडळाकडून पहिल्यांदाच प्रायोगिक स्तरावर चाचपणी केली जाणार आहे.

वेगवान प्रक्रिया, गोपनीयतेसाठी ऑनस्क्रीन मूल्यांकन उपयुक्त

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, ‘ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका संबंधित परीक्षकाच्या प्रणालीमध्ये उपलब्ध होतात. त्यासाठी लॉग-इन प्रक्रिया असते. त्यामुळे उत्तरपत्रिकांची गोपनीयता राखणे शक्य आहे. शिवाय कागदी उत्तरपत्रिका तपासण्यापेक्षा ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा वेगही जास्त असतो. परिणामी, निकाल वेळेत जाहीर करणे शक्य होते. प्रणाली तांत्रिकदृष्ट्या जितकी सक्षम असेल, तितकी ती त्रुटीरहित होते. शिवाय ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे खर्चातही बचत होते, कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरणासाठीही हातभार लागतो. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणीही तातडीने पुरवणे शक्य होते.’