पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (१४ जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापाून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून, तर बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली. त्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४८ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी १५ ते २४ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्या पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरून भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
जून-जुलै २०२६ च्या दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी-गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ आणि फेब्रुवारी-मार्च २०२८ या लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील. फेब्रुवारी-मार्च २०२७ची परीक्षा देणारे दहावी, बारावीचे नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले.
