पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी (२८ जुलै) प्रसिद्ध केली जाणार आहे. केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाला तूर्तास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीद्वारे पुणे- पिंपरी चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेशासाठी एक लाख ९ हजार १५० जागा उपलब्ध आहे. त्यासाठी या दोन शहरांतून बुधवारी रात्रीपर्यंत साधारण ६४ हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरत ऑनलाइन अर्ज पूर्ण भरले आहेत. यातील नऊ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशांतर्गत पसंतीक्रम नोंदवले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल करण्यात येणार नसल्याने, पहिल्या प्रवेश फेरीच्या प्रवेश यादीसाठी पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत एक लाख ७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली, तरी अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार प्रवेश प्रक्रियेत होणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर, यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑगस्टपर्यत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.