पुणे : ‘खासगी रुग्णालयांच्या नियमनासाठी राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयका’चा अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी ‘जन आरोग्य अभियाना’सह रुग्ण हक्कांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींना संयुक्त निवड समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी,’ अशी मागणी जन आरोग्य अभियानाने केली आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर आतापर्यंत सुमारे ९०० हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.
या विधेयकाच्या मसुद्यावर सूचना मांडण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ आमदारांची संयुक्त निवड समिती स्थापन करण्यात आली असून, ६ ऑगस्ट रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत जनआरोग्य अभियानाच्या प्रतिनिधींनी रुग्णांच्या हक्कांसंदर्भातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला होता. त्या वेळी सामाजिक संस्था आणि रुग्ण हक्क संघटनांशी स्वतंत्र चर्चा करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे अभियानाचे म्हणणे आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत काही आमदारांनीही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केल्याची माहिती अभियानाच्या प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे समितीने सर्व संबंधित संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच विधेयकाला अंतिम स्वरूप द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जनआरोग्य अभियानाचे कार्यकर्ते रवींद्र देसाई यांनी सांगितले की, नवे विधेयक अमलात येण्यापूर्वी जनतेचे प्रतिनिधी, जनआरोग्य अभियानाच्या सभासदांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच, यासाठी आम्ही आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच, ज्या सूचना आल्या आहेत, त्याचाही विचार करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने विधेयकात बदल करावेत, अशी अपेक्षा आहे.
जन आरोग्य अभियानाच्या प्रमुख मागण्या
- २०२१ च्या कायद्यातील आणि राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदेतील सर्व रुग्ण हक्क नव्या कायद्यात समाविष्ट करावेत.
- खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करून त्यांचे प्रमाणीकरण करावे.
- जिल्हा आणि राज्य पातळीवर सक्षम तक्रार निवारण यंत्रणा उभारावी.
- राज्य परिषदेत रुग्ण हक्क संघटना, महिला संघटना, परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे.
- छोट्या, ग्रामीण आणि सेवाभावी रुग्णालयांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करावेत.
