पुणे : राज्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईचा विचार, तसेच सद्यस्थितीतील मानधन कमी असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळत नसल्याने मानधनात वाढ करण्यात आली असून, आता तासिका तत्त्वावरील शिक्षकांना २०५ ते २५० रुपये प्रतितास या नव्या दरांनुसार मानधन देण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. सुधारित मानधन वाढ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू केली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी राज्यभरात १०० शासकीय निवासी शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये नियमित शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांसाठी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक केली जाते. या पूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये निश्चित करण्यात आलेले मानधन सध्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दरम्यानच्या काळात महागाईचे प्रमाण वाढले आहे. कमी मानधनामुळे दर्जेदार शिक्षक उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. तसेच निवासी शाळांचे स्वरूप लक्षात घेता शिक्षकांना केवळ अध्यापन न करता पूर्णवेळ उपस्थित राहून ‘दैनंदिन पर्यवेक्षक’ म्हणून काम करावे लागते, त्या त्या इयत्तांमध्ये अपेक्षित क्षमता पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेणे आवश्यक असते. त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यासाठी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुधारित मानधन दरांनुसार दरमहा १०५ तासांसाठीचे मानधन देण्यात येणार आहे. त्यात पूर्ण अर्हताधारक माध्यमिक शिक्षकाला २५० रुपये प्रति तास, अपूर्ण अर्हताधारक माध्यमिक शिक्षकाला २२५ रुपये प्रतितास, प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाला २२५ रुपये प्रति तास, अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाला २०५ रुपये प्रति तास मानधन दिले जाणार आहे. मात्र, दररोज पाच तासिका या प्रमाणे मासिक तासिका पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच सुधारित मानधन लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
५०० रुपयांच्या मुद्रांकावर करारपत्र
तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी केवळ तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना भविष्यात सेवेत कायम किंवा नियमित करण्याचा कोणताही हक्क सांगता येणार नाही, ही वस्तुस्थिती संबंधित शिक्षकांना माहीत असणे आवश्यक आहे. ही अट स्वीकारल्याबाबत शिक्षकांकडून ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करारपत्र करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
