पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या गेल्या चार वर्षांत १ लाख ३७ हजारांनी घटल्याचे समोर आल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये १०० टक्के पटसंख्या नोंदणीचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. तसेच, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देण्यात येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी शाळा दत्तक देण्यात येत आहेत. त्यानुसार, संंबंधित अधिकाऱ्यांनी वर्षभरात वेळोवेळी शाळांना भेट देऊन विद्यार्थी गुणवत्ता, शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करावे. शिक्षण विभागातील डाएट प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, योजना शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना शाळा दत्तक देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वर्षभर कृती कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी उपाययोजनांबाबत नियुक्त केलेल्या राज्यस्तर समितीच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्या वाढविण्यासाठी मार्च ते जून कृती कार्यक्रम, शाळा सुरू झाल्यापासून वर्षभरासाठी राबविण्याचे उपक्रम, कृती कार्यक्रम सुचवण्यात आले आहे. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रमांची अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे स्वागत

शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटीबाबत प्रचार-प्रसार करावा, शाळा भेटीच्या अनुषंगाने शाळा स्वच्छता, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पहिले पाऊल संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेणे, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.