पुणे : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची विशेष पथकाद्वारे एकाच वेळी पडताळणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या पडताळणीमध्ये अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंद केल्याचे आढळून आल्यास सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी या बाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संचमान्यता यूडायस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे केली जाणार आहे.
त्यासाठी यूडायस प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापक लॉगिनद्वारे माहिती भरण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची माहिती संचमान्यतेसाठी विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणीकरण, सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांची आहे. त्यामुळे केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यात अनियमितता आढळल्यास त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुखांच्या लॉगिनला पाठवण्यात आली आहे. यूडायस प्लसमधील स्टुडंट पोर्टलवर मिळालेली माहिती केंद्रप्रमुखांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी उपस्थित असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी, तसेच या पूर्वी शाळेला भेट दिली असल्यास त्या दिवशीची उपस्थिती या सर्वांचा विचार करून केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी, सतत अनुपस्थित असणारे, केवळ शिक्षक-शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढवलेला पट संचमान्यतेसाठी पाठवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा पडताळून नमूद विद्यार्थ्यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करावी. चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी समाविष्ट केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी कमी करावेत. ही प्रक्रिया १५ डिसेंबरपूर्वी अंतिम करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
