पुणे : राज्यातील सहावी ते बारावी या इयत्तांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या व्हॉट्सॲप समूहांद्वारे विषय समित्या स्थापन कराव्या लागणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्ययन-अध्यापन साहित्य, चित्रफितीनिर्मिती, करिअर मार्गदर्शन याबाबत शिक्षकांशी संवाद साधला जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. शिक्षकांच्या व्हॉट्सॲपवर विषय समित्या स्थापन करण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर विविध विषय शिक्षकांच्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. विषय समित्या अद्याप स्थापन न केलेल्या जिल्ह्यांनी तातडीने समित्यांची स्थापना करावी. विषय समित्यांमध्ये कृतिशील, समर्पितपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश करावा, जिल्हा समित्यांमार्फत गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवावेत, तसेच चाचणीद्वारे इयत्तानिहाय, विषयनिहाय अध्ययनस्तर निश्चित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

माध्यमिक स्तरावर सहावी ते दहावी या इयत्तांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांच्या समित्या स्थापन कराव्यात, उच्च माध्यमिक स्तरासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश असेल. या समित्यांच्या माध्यमातून अध्यापनासाठी आवश्यक अध्ययन अध्यापन साहित्य, शैक्षणिक चित्रफितींची निर्मिती, करिअर मार्गदर्शनासंबंधी उपक्रम राबविणे या बाबत शिक्षण आयुक्त यू-ट्यूबद्वारे संवाद साधणार आहेत. राज्यस्तरावर व्हॉट्सॲप गट स्थापन केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे उत्कृष्ट, उपक्रमशील आणि नवोपक्रमशील किमान पाच विषय शिक्षकांचा समावेश करावा. तसेच, जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांचा अहवाल शिक्षण संचालनालयाला सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे.

सहावी, नववीची गुणवत्ता तिसरीच्या तुलनेत कमी

परख सर्वेक्षणानुसार इयत्ता सहावी, नववीची गुणवत्ता इयत्ती तिसरीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे इयत्ता सहावी ते बारावीच्या गुणवत्तावाढीसाठी विषय समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेषतः इयत्ता तिसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते बारावी या स्तरांवर अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी विषय समित्यांनी प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.