पुणे : महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) यंदा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबवण्यात आलेल्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला १ लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यात सर्वाधिक प्रवेश संगणक अभियांत्रिकी शाखेत झाले असून, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांंमध्ये सर्वाधिक ६४ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे.

सीईटी सेलने या बाबतची माहिती दिली. राज्यातील एकूण ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयातून १११ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात १ लाख १४ हजार १२१ विद्यार्थी, तर ६७ हजार ८०६ विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. गेल्या वर्षी (२०२५-२६) १ लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांचा टक्का १५ हजारांनी वाढला आहे. अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमधून सर्वाधिक २८ हजार १७० विद्यार्थ्यांनी संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्या खालोखाल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अशा शाखांमध्ये प्रवेश झाले.

सीईटी कक्ष राज्यातील सार्वजनिक १७ विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश करते. यंदा सर्वाधिक ६४ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश घेतला, या खालोखाल ३४ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयांत, ३२ हजार १२६ विद्यार्थ्यांनी मुंबईतील मुंबई विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयांत १७ हजार ८४ विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, ९ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची माहिती सीईटी सेलने दिली.

शाखानिहाय प्रवेश

संगणक – २८,१७०
मेकॅनिकल – १९,७०२
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन – १८,८९५
संगणकशास्त्र – १८,२७७
माहिती तंत्रज्ञान – १५,२१९
स्थापत्य – १४,२१३
इलेक्ट्रिकल – ११,७२६
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान – १०,५०२

विद्यापीठनिहाय झालेले प्रवेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ६४,८२२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ -३४,३८५
मुंबई विद्यापीठ – ३२,१२६
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – १७,०८४
शिवाजी विद्यापीठ – ९,९२१
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ – ९,५७१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ – ३,२७४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – २,९९३
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – २,३५१
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे – १,३८७