पुणे : राज्यभरात राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत वाहनांसाठी चार्जिंगचे जाळे उभारण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी सोय होणार असली तरी यासाठी चार्जिंगचा दर प्रतियुनिट २२ रुपये आकारण्यात येणार आहे. हा दर जास्त असल्याने तो कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

‘एका मोबिलिटी’च्या सहा उत्पादन प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, एका मोबिलिटीचे अध्यक्ष सुधीर मेहता व सुनंदा मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, देशभरातील महामार्गावर चार्जिंग सुविधांची उभारणी केली जात असून, त्यासाठी प्रतियुनिट २२ रुपये दर आहे. ही बाब सुरुवातीला माझ्या लक्षात आली नाही नाहीतर त्याच वेळी हा दर मी कमी ठेवण्यास सांगितले असते आता याबाबत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना सूचना केलेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार यात वाहनचालकांना दिलासा देण्याचे काम करू शकते. राज्य सरकारने सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतियुनिट ५ रुपये आणि त्यानंतर रात्री प्रतियुनिट ८ ते १० रुपये दर आकारावा.

यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगचे दर किफायतशीर ठेवावेत, अशी सूचना गडकरींनी केली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने राज्य सरकार पावले उचलणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगचे दर कमीतकमी आकारण्यात येतील. याचबरोबर राज्यभरात चार्जिंगचे जाळे उभारण्यासाठी राज्य सरकार आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेईल. विद्युत वाहनांसाठी सक्षम चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडाही तयार केला आहे.

हरित ऊर्जेवर सरकारचा भर

राज्यातील हरित ऊर्जा निर्मितीक्षमता सध्या ३५ गिगावॉट आहे. त्यात २०३० पर्यंत आणखी ४६ गिगावॉटची भर पडणार असून, यातील ९१ टक्के हरित ऊर्जा असेल. यातून एकूण ऊर्जेतील हरित ऊर्जेचे प्रमाण ५२ टक्क्यांवर जाईल. हे प्रमाण २०३५ पर्यंत ६५ टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. या माध्यमातून आपण आगामी काळात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारी विजेची मागणी हरित ऊर्जेमधून पूर्ण करू, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.