पुणे : औद्योगिक क्षेत्राला नवे बळ देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात साकारण्यात येणार आहे. ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यातील पहिले सामायिक सुविधा केंद्र (क्लस्टर) उभारण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) पुढाकार घेतला आहे. याचबबरोबर खाद्यप्रक्रिया उद्योगाच्या क्लस्टरचाही प्रस्ताव आहे. मराठा चेंबरतर्फे दोन्ही क्लस्टरसाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी लवकरच सादर केले जाणार आहेत.

देशभरात काही ठिकाणी ड्रोन पार्क किंवा तंत्रज्ञान केंद्रे उभारली जात असली तरी, औद्योगिक क्लस्टर स्वरूपात उभारले जाणारे हे राज्यातील ड्रोनसाठीचे पहिले क्लस्टर असेल. सध्याच्या नियोजनानुसार मार्च २०२७ अखेरपर्यंत ही दोन्ही क्लस्टर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया या दोन्ही क्लस्टरमुळे पहिल्या टप्प्यात सुमारे २०० सूक्ष्म व लघुउद्योजकांना थेट फायदा होण्याचा अंदाज आहे. त्या दोन्ही क्षेत्रातील सूक्ष्म, लघु उद्योगांना आणि त्यांच्या पूरक उद्योगांना चाचणी सुविधा, संशोधन आणि विकास आणि प्रारूप आराखडा आणि बाजारपेठेत विक्रीपूर्वी सुरुवातीची उत्पादन सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. त्यामुळे ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया उद्योग क्षेत्रांमध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांना पाठबळ मिळेल, अशी माहिती चेंबरने दिली.

चेंबरकडून राज्याच्या उद्योग विभागाकडे क्लस्टरसाठीचा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची अंतिम मंजुरी, निधी वितरण, प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी निविदा प्रक्रिया, सॉफ्टवेअर कामकाज करण्यासाठी मनुष्यबळ आणि मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड असे टप्पे असतील. त्यासंबंधी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चेंबर संपर्कात आहे. या प्रकल्पाचा राज्यातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना नवीन वाटा शोधण्यासाठी उपयोग होईल, असे चेंबरने म्हटले आहे.

ड्रोन क्लस्टर

ड्रोन क्लस्टर म्हणजे ड्रोन आणि त्याच्या सुट्या भागांसाठी आवश्यक असे आरेखन, संशोधन, चाचणी आणि संबंधित तंत्रज्ञानाशी निगडित उद्योगांना एकाच ठिकाणी उपलब्ध अशी सुविधा असेल. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व जागेचा खर्च वाचवून जास्तीतजास्त रक्कम यंत्रसामग्री व सॉफ्टवेअरमध्ये गुंतवता यावी यासाठी चेंबरच्या पिंपरी औद्योगिक वसाहतीमधील शाखेत हा प्रकल्प साकारणार आहे. संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील ड्रोनचा वाढता वापर लक्षात घेता या क्लस्टरमुळे राज्यातील ड्रोन क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे.

खाद्यप्रकिया तंत्रज्ञान क्लस्टर

हडपसर येथील मराठा चेंबरच्या कार्यालयात उभारण्यात येणारे खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर हे कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी एकात्मिक सुविधा केंद्र असेल. गुणवत्ता तपासणी आणि निर्यातीसाठी प्राथमिक चाचणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा यामागे उद्देश आहे. खाद्यप्रक्रिया क्षेत्रात नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या आणि या क्षेत्रात स्थिरावू पाहणाऱ्या घटकांना या सुविधेचा फायदा होईल.

भविष्यकालीन नियोजन

सूक्ष्म आणि लघुउद्योजकांची भविष्यकालीन गरज ओळखून ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर हे प्रकल्प साकारले जातील. यामध्ये सुरुवातीला १२-१५ उद्योजक प्रवर्तक असतील. भांडवलाची गरज काही प्रमाणात पुरविण्यासाठी आणि तांत्रिक मार्गदर्शन यासाठी मोठ्या कंपन्या सहभागी असतील. या क्षेत्रातील नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना या सुविधांचा पहिल्या टप्प्यात वापर करता येईल, असे मराठा चेंबर ऑफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी स्पष्ट केले.