पुणे : राज्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र (इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) पुण्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. या केंद्रात सुमारे ५० ते ६० कंपन्यांकडून दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून पाच हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यात हे केंद्र कार्यान्वित होणार आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र योजनेअंतर्गत पुण्याची निवड केली. त्यात रांजणगाव औद्योगिक क्षेत्राची या उत्पादन केंद्रासाठी अंतिम निवड झाली. या प्रस्तावाला २०२२ मध्ये मंजुरी मिळून त्याचे काम सुरू झाले. सध्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात या केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प २९७ एकरांवर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात कंपन्यांसाठी उत्पादन सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेत कंपन्या गुंतवणूक करून लगेचच उत्पादन सुरू करू शकणार आहेत. या प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपयांचा एकूण खर्च आला असून, त्यातील जवळपास निम्मा खर्च केंद्र सरकारकडून मिळाला आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राच्या माध्यमातून कंपन्यांकडून दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. तसेच, यातून पाच हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पाच्या सुरूवातीच्या टप्प्यात दोन कंपन्यांनी गुंतवणूक करून उत्पादनास सुरूवात केली आहे. त्यात आयएफबी रेफ्रिजरेशन या कंपनीने ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, १ हजार २०० रोजगार निर्माण केले आहेत. तसेच, स्टॅरियन एचके इंडिया कंपनीने १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यातून ३२० रोजगार निर्माण झाले आहेत. या प्रकल्पात एकूण ५० ते ६० इलेक्ट्रॉनिक कंपन्या गुंतवणूक करण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राची वैशिष्टे

  • एकूण कंपन्या – ५० ते ६०
  • गुंतवणूक – २ हजार कोटी रुपये
  • रोजगार – ५ हजार

दळणवळणाच्या सुविधा

  • मुंबई-बंगळुरू महामार्गानजीक
  • पुणे विमानतळ ४५ किलोमीटर
  • रांजणगाव रेल्वे स्थानक ५ किलोमीटर
  • पुण्यापासून ५० ते ५५ किलोमीटर
  • जेएनपीटीपासून १४० ते १५० किलोमीटर

एखाद्या उद्योगाने गुंतवणूक केल्यास जागा घेऊन विकसित करून उत्पादन सुरू होण्यास सुमारे एक ते दोन वर्षांचा कालावधी जातो. या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रात उद्योगांसाठी तयार सुविधा देण्यात येणार आहेत. त्यातून एखाद्या उद्योगाने या केंद्रात जागा घेतल्यानंतर महिनाभरात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करता येईल. पुढील दोन महिन्यांत हे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र कार्यान्वित होईल. – निलेश मोढवे, अधीक्षक अभियंता, एमआयडीसी.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या बाजूला इतर कंपन्यांसाठी जागा विकसित करण्यात आली असून, त्यातील २० टक्के जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राची परिसंस्था निर्माण होईल. लवकरच या केंद्रातील जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. – अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.