पुणे : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत पद्धतीने (कॅप) प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठीची मुदत बुधवारी (३ जून) संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रवेश पुणे विभागात, सर्वांत कमी प्रवेश लातूर विभागात झाले आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतची माहिती दिली. राज्यभरात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी एकूण २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध आहेत. नियमित पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २९ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी (२ जून) सायंकाळपर्यंत ३ लाख ३९६ विद्यार्थ्यांनी ‘कॅप’च्या माध्यमातून, २६ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश निश्चित केला आहे. एकूण ३ लाख २६ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक प्रवेश पुणे विभागात झाले आहेत. पुणे विभागात झालेल्या ६५ हजार ३२९ प्रवेशांपैकी ६० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, ४ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश घेतला आहे. मुंबई विभागात झालेल्या ५४ हजार ६७ प्रवेशांपैकी ४७ हजार १४० विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, ६ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश घेतला आहे.
नागपूर विभागातील ४० हजार २८९ प्रवेशांपैकी ३७ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, २ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३६ हजार ८२, अमरावती विभागात ३५ हजार ५०१, कोल्हापूर विभागात ३५ हजार ९९२, नाशिक विभागात ३९ हजार ६०२, तर लातूर विभागात केवळ २० हजार ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी (३ जून) प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
एनसीएल, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोहोच पावती, हमीपत्राद्वारे प्रवेश
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत एनसीएल, ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एनसीएल, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत किंवा पर्याय देण्याची मागणी विद्यार्थी, पालक, संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करताना एनसीएल, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदत देऊन प्रवेश देण्याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालाक, शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
