पुणे : राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नव्याने सूचना आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण करावी लागणार असून, नियमित तीन फेऱ्या संपल्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. तसेच, १५ जुलै किंवा त्यापूर्वी शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. गेल्या वर्षी राज्यातील अकरावीची प्रक्रिया केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठीच्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ६ मे २०२५ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाच्या तरतुदी राज्यातील राज्य मंडळ सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहणार आहेत. द्विलक्ष्यी, तांत्रिक विषयांचे प्रवेश प्रवेश प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने शाळा स्तरावर गुणवत्तेनुसार केले जातील. शिक्षण विभागाव्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय आणि अन्य विभागांच्या राज्य मंडळ संलग्न शाळांच्या प्रमुखांनी मान्यता दिल्यास संबंधित शाळा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. मात्र, संबंधित विभागांनी ३० एप्रिलपूर्वी परवानगी देणे अनिवार्य असेल. खासगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ करणे, विलंब करणे, अवाजवी शुल्क आकारणे, प्रवेशास मनाई केल्यास आवश्यकतेनुसार कारवाई करण्यास विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्राधिकृत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना एकाच ऑनलाइन अर्जाद्वारे राज्यातील महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना किमान एक तर कमाल दहा पसंतीक्रम नोंदवता येतील. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, त्यानंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन टू ऑल) फेरी आणि मुलींसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि संस्थातर्गत (इनहाऊस) कोट्यातील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करता येईल. मात्र, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास प्रवेश रद्द केल्यानंतरच्या लगतच्या फेरीत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जात दिलेली माहिती, प्रत्यक्ष प्रवेशावेळी सादर केलेल्या कागदपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवले जाणार आहे. पाचव्या फेरीनंतरच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असतील. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ५ फेऱ्यांत पूर्ण करावी. पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी १० दिवसानंतर, त्यानंतरच्या प्रवेश फेरीतील प्रवेश कमाल आठ दिवसांत पूर्ण करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा शिक्षण उपसंचालकांकडून आयोजित केल्या जातील. तर प्रशिक्षित मुख्याध्यापक, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाइन प्रवेश संचमान्यतेसाठी ग्राह्य

अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळाला उपलब्ध करून द्यावी. बारावीच्या परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयातूून अर्ज भरण्यात आलेले विद्यार्थी केवळ ऑनलाइन व्यवस्थेतूनच आल्याची खातरजमा राज्य मंडळाने करावी. अकरावी ऑनलाइन व्यवस्थेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज मागे घेण्याचा पर्याय

आयटीआय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशित होणारे बरेचसे विद्यार्थी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतही अर्ज करतात. प्रवेश घेतलेले विद्यार्थी पुन्हा पुन्हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत येत राहतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यां अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.