पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी, इंटरमिजिएट), शासकीय उच्चकला (कला पदविका) अशा परीक्षांचे शुल्क, सेवा शुल्कात वाढ केली आहे. त्याबरोबरच पारितोषिकांची रक्कमही वाढवण्यात आली असून, सुधारित दर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ आणि कला संचालनालयाच्या प्रस्तावानुसार वित्त विभागाच्या शुल्कवाढ, पारितोषिक रक्कम वाढवण्यास मान्यता दिली. २०१२ नंतर १४ वर्षांनी शुल्क, पारितोषिक रकमेत वाढ करण्यात आली आहे. शासकीय रेखाकला परीक्षेतील एलिमेंटरी परीक्षेसाठी आता राज्यातील विद्यार्थ्यांना ५० ऐवजी १०० रुपये, राज्याबाहेर विद्यार्थ्यांना १०० ऐवजी २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. इंटरमिजिएट परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना १०० ऐवजी २०० रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना २०० ऐवजी ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षांतील गुणवत्तायादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

पारितोषिक रकमेत वाढ

पारितोषिकांची एकूण रक्कम ५६ हजारांवरून ४ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एलिमेंटरी परीक्षेतील पहिल्या २० विद्यार्थ्यांना पूर्वीच्या २५० ऐवजी आता २ हजार रुपये, २१ ते ४० क्रमांकातील विद्यार्थ्यांना पूर्वीच्या २०० ऐवजी १ हजार रुपये, ४१ ते १०० क्रमांकातील विद्यार्थ्यांना पूर्वीच्या १५० ऐवजी १ हजार रुपये, तर विषयनिहाय पारितोषिकांमध्ये प्रत्येक विषयातील १० विद्यार्थ्यांना पूर्वीच्या १०० ऐवजी आता ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या २० विद्यार्थ्यांना पूर्वीच्या ३५० ऐवजी ३ हजार रुपये, २१ ते ४० क्रमांकातील विद्यार्थ्यांना ३०० ऐवजी २५०० रुपये, ४१ ते १०० क्रमांकातील विद्यार्थ्यांना २५० ऐवजी २ हजार रुपये, विषयनिहाय पारितोषिकांतर्गत प्रत्येक विषयातील दहा विद्यार्थ्यांना १५० ऐवजी हजार रुपये पारितोषिक स्वरूपात दिले जाणार आहेत.

उच्चकला परीक्षा शुल्कात वाढ

शासकीय उच्चकला परीक्षेतील मूलभूत अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क ४४० रुपयांवरून ७०० रुपये, कलाशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी अनुक्रमे ६२० आणि ६४० रुपयांवरून ९५० रुपये, कला शिक्षण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी १ हजार ४० रुपयांवरून १६०० रुपये, आर्ट मास्टर प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ६४० रुपयांवरून ९५० रुपये, रेखा-रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला (इंटरमिजिएट) अभ्यासक्रमासाठी ९६० रुपयांवरून १४५० रुपये, रेखा-रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला पदविका अभ्यासक्रमासाठी १४१० रुपयांवरून २१५० रुपये, तर वस्त्रकाम, विणकाम, गृहसजावट, मातकाम, धातुकाम (आर्ट अँड क्राफ्ट) अभ्यासक्रमासाठी ९६० ऐवजी १४५० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सेवा शुल्कातही वाढ

विविध प्रकारच्या सेवा शुल्कातही वाढ करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना दुय्यम गुणपत्रकासाठी १०० रुपये, उच्चकला दुय्यम प्रमाणपत्रासाठी १५०, रेखाकला दुय्यम प्रमाणपत्रासाठी २०० रुपये, गुणपत्रकातील नावाच्या दुरुस्तीसाठी १५० रुपये, उच्चकला परीक्षा प्रमाणपत्रातील नावाच्या दुरुस्तीसाठी १५० रुपये, श्रेणी पडताळणी आणि गुणपडताळणी (प्रतिमुद्दा) प्रत्येकी १०० रुपये, गुणपत्रक पडताळणीसाठी १५० रुपये, ट्रान्सस्क्रिप्टसाठी ५०० रुपये, पात्रता प्रमाणपत्रासाठी २०० रुपये, स्थलांतर प्रमाणपत्रासाठी २०० रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना रेखाकला दुय्यम प्रमाणपत्रासाठी ४०० रुपये, रेखाकला परीक्षा प्रमाणपत्रातील नावाच्या दुरुस्तीसाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.