राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक जाहीर झाले आहे. राज्य शासनाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पदकाची घोषणा करण्यात आली आहे. गोव्यातील मद्य तस्करी, गावठी दारू निर्मितीच्या विरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन रजपूत यांनी दोन वर्षात आठ हजार पेक्षा अधिक कारवाया केल्या आहेत. रजपूत यांच्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. पदक, सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी आणि कर्चमाऱ्यांचे मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे. हेही वाचा >>> बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले… असं आमचं सरकार – अजित पवार उत्पादन शुल्क विभागात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने विशेष पुरस्कार देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेतील सन 2023- 24 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट तथा गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल विविध पदके, सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये राज्य स्तरावरून तीन पुरस्कार जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा पदकासाठी छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक संतोष झगडे यांची निवड करण्यात आली असून विशेष मोहीम पदक पुणे येथील अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तपास पदकाकरिता ठाणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना देण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त स्तरावरून देण्यात येणाऱ्या विविध पदक, सन्मानचिन्हकरिता एकूण पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विशेष सेवा पदकाकरिता ठाणे जिल्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांची निवड करण्यात आली आहे.आयुक्त सन्मानचिन्हसाठी मुंबई शहर भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश काळे, महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू आणि मुंबई येथील जवान संतोष शिवापुरकर, धुळे येथील जवान गोरख पाटील यांची निवड करण्यात आली आहे.