पुणे : ‘शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी, त्या दृष्टीने मुलींना सुविधा देण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. मुलींना मोफत शिक्षण सुविधा सुरू केल्यानंतर तंत्रशिक्षणातील मुलींची संख्या ५३ हजारांनी वाढली आहे. आता मुलींसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना आणण्याचाही प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’तर्फे (एआयएसएसएमएस) आयोजित मुलींच्या वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभात पाटील बोलत होते. ‘एआयएसएसएमएस’चे अध्यक्ष खासदार डॉ. शाहू छत्रपती, मानद सचिव मालोजीराजे छत्रपती, सहसचिव सुरेश शिंदे, कारभारी मंडळाचे अध्यक्ष भगवान साळुंखे, व्ही. बी. पाटील, खजिनदार अजय पाटील या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘दळणवळणाची कितीही साधने झाली, तरी शिक्षण संस्थेतच मुलींच्या निवासाची सोय झाल्यास त्याचा शैक्षणिक फायदा विद्यार्थिनींना होतो. तसेच, पालकांत सुरक्षिततेची भावना निर्माण होते. मुलींच्या शिक्षणासाठी सरकार आग्रही आहे. ९०० कोटी रुपयांचा भार घेऊन मुलींना मोफत शिक्षण, वसतिगृह मर्यादा लक्षात घेऊन निर्वाह भत्ता योजना सुरू केली. आता शिक्षण शुल्कातच अन्य शुल्काचा (अदर फी) समावेश करून त्याचीही शुल्कप्रतिपूर्ती करण्याचा विचार सुरू आहे.
त्यामुळे येणाऱ्या आर्थिक भाराचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच, मुलींसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना आणण्याचा प्रयत्न आहे. मुलींना महिना किमान दोन हजार रुपये मिळावेत, हा विचार आहे. सुविधा वाढल्याशिवाय मुलींना शिक्षणाचे प्रोत्साहन मिळणार नाही. मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केल्यापासून तंत्रशिक्षणात मुलींची संख्या ५३ हजारांनी वाढली. शिक्षणाच्या क्षेत्रात छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय त्याचाच एक भाग आहे.’
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढणे आवश्यक
‘मुलींना सर्व प्रकारच्या सुविधा वसतिगृहात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात मुलींसाठी मोफत सक्तीचे शिक्षण सुरू केले होते. त्या धर्तीवर आता देशभरात मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते, ही समाधानाची बाब आहे. शाहू महाराजांचा विचार घेऊन जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन संस्था कार्यरत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. संख्यात्मक विकासासह संस्थेचा गुणात्मक विस्तार होणे महत्त्वाचे आहे,’ असे डॉ. शाहू छत्रपती यांनी नमूद केले.
वसतिगृहात ३५० मुलींची सोय
‘संस्थेच्या तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध संस्था आहेत. १२००हून अधिक शिक्षक, १५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कायमच भर दिला आहे. वसतिगृहाच्या ७ मजली नव्या इमारतीमुळे ३५० मुलींची सोय होणार आहे,’ अशी माहिती मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.
