राज्य शासनाचे आदेश; ‘सुटय़ांच्या दिवशी नाटय़प्रयोगांना प्राधान्य द्यावे’

पिंपरी : करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मराठी नाटकांच्या भाडेदरात ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सवलत देण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे नाटय़निर्मात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच बैठक झाली. या वेळी झालेल्या चर्चेत रंगकर्मीच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, नाटय़गृहाच्या भाडेदरात सवलत मिळावी, या मागणीविषयी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्य शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी २७ जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. नाटय़गृहे सुरू झाल्यानंतर नाटय़निर्मात्यांना भाडेदरात सवलत देण्याची सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी बृहन्मुंबई महापालिकेकडून मराठी कार्यक्रमांसाठी प्रतिसत्र २० हजार रुपये दर आकारण्यात येत होता. आता प्रतिसत्र पाच हजार रुपये तर अमराठी कार्यक्रमांसाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेप्रमाणेच सर्व संबंधित महापालिका व नगरपरिषदांनी नाटय़गृहाच्या भाडेदरात ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सवलत देण्याचा विचार करावा. नाटकांच्या तालमींना सवलत देण्याविषयी उचित कार्यवाही करावी. तसेच, आठवडय़ाच्या सुटीला व इतर सार्वजनिक सुटय़ांच्या दिवशी मराठी नाटय़प्रयोगांना प्राधान्यक्रम द्यावा, असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.