पुणे : मुलींच्या शिक्षणाला शासनाची सर्वाधिक प्राथमिकता आहे. त्यासाठीच आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मोफत शिक्षण देण्याची घोषणा मध्यंतरी केली होती. मात्र, लोकसभा आणि आता मुंबईत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन आदेश जाहीर होण्यास विलंब झाला. लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होऊन शासन आदेश लागू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिली.

श्री शुल्क यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणेतर्फे कसबा पेठेतील याज्ञवल्क्य आश्रमाच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, संस्थेचे मनोज तारे, प्रमोद चंद्रात्रे, जगदीश नगरकर, भाजपा नेते हेमंत रासने, स्वरदा बापट, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, माजी नगरसेवक राजेश येनपुरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…राज्यात आतापर्यंत सरासरी पाऊस जास्त; कोकण, विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी

पाटील म्हणाले की, पुणे हे पेठांचे शहर आहे. या शहरात अनेक संस्था, संघटना वर्षानुवर्षे समाजसेवेचे काम उत्तम पद्धतीने करत आहेत. त्यातील काही संस्थांनी आपले शतक महोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. तर काही संस्था शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहेत. श्री. शुल्क यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा ही त्यापैकीच एक आहे. समाज सेवेतील योगदान लक्षात घेता अशा सर्व संस्थांचा विकास झाला पाहिजे. संस्थेने हाती घेतलेला सांस्कृतिक भवनाचा प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. केवळ छोटी वास्तू उभारून आपले काम मर्यादित न ठेवता अतिशय भव्य आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त अशी इमारत उभी करावी, समाज बांधवांकडूनही आवश्यक सहकार्य घ्यावे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल.