पुणे : राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टरांच्या आणि प्राध्यापकांच्या एकूण मंजूर जागांमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमांचे कारण देऊन सरकारने ‘प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधशास्त्र’ या महत्त्वाच्या विभागाचा सुधारित आकृतिबंध जाहीर केला आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी या संदर्भातील आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची संख्या पूर्वीपेक्षा कमी होणार असून, २७ पदे कायमची रद्द होणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या निश्चित केली आहे. राज्यातील काही जुन्या महाविद्यालयांमध्ये नियमांपेक्षा जास्त पदे मंजूर होती, तर काही नवीन महाविद्यालयांमध्ये ती कमी होती. त्यामुळे ज्या ठिकाणी नियमांपेक्षा जास्त पदे होती, तेथील जागा रद्द करण्याचा किंवा दुसऱ्या, ज्या ठिकाणी गरज आहे, त्या महाविद्यालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधी ३०९ पदे, आता २८२

सरकारच्या जुन्या नियमांनुसार या विभागासाठी राज्यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांची एकूण ३०९ पदे मंजूर होती. मात्र, आता नव्या नियमांनुसार ही संख्या २८२ वर आली आहे. एकूण २७ पदे कायमची कमी करण्यात आली आहेत.

कोणत्या महाविद्यालयांतील जागा घटणार?

या निर्णयामुळे राज्यातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांतील मंजूर पदे कमी होणार आहेत. यामध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज (जे. जे. रुग्णालय), पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मिरज, धुळे, लातूर, अलिबाग, सिंधुदुर्ग आणि सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. अहिल्यानगर आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांना काही पदे वर्ग करून देण्यात आली आहेत.

कंत्राटी डॉक्टरांवर बेरोजगारीची टांगती तलवार

ज्या २७ जागा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा ज्या १८ जागा दुसऱ्या महाविद्यालयात हलविण्यात आल्या आहेत, त्या जागांवर जर सध्या कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट) पद्धतीने डॉक्टर किंवा प्राध्यापक काम करीत असतील, तर त्यांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

.प्रकारनिहाय कमी झालेल्या जागा

प्राध्यापक : आधी ४० पदे, आता ३८ (२ पदे कमी)
सहयोगी प्राध्यापक : आधी १०५ पदे, आता ८८ (१७ पदे कमी)

सहाय्यक प्राध्यापक: आधी १६४ पदे, आता १५६ (८ पदे कमी)