पुणे : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत तालुका ते राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनांत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील ‘नासा’, बंगळूरू येथील ‘इस्रो’सह राज्यातील नामांकित विज्ञान संस्था पाहण्याची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विज्ञान शिक्षणाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. अनुभवाधारित आणि प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान समजण्यासाठी अधिक सोपे करण्यात येत आहे. शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रयोगशाळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा उपक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणारे प्रत्येकी सहा, असे एकूण २१४८ विद्यार्थी, त्यांच्यासह २० पर्यवेक्षक किंवा विज्ञान शिक्षक यांना नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र किंवा मुंबईतील नेहरू तारांगण यांपैकी जे केंद्र नजीक असेल, त्या ठिकाणी भेट आयोजित केली जाईल. जिल्हास्तरावरील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील सर्वसाधारण गट, दिव्यांग गट आणि आदिवासी गटामधून निवड झालेले एकूण १८० विद्यार्थी, ८ पर्यवेक्षक किंवा शिक्षक यांची बंगळूरू येथील ‘इस्रो’ संस्थेला भेट देण्याचे आयोजन केले जाईल.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, एक पुरुष शिक्षक, एक महिला शिक्षक, दोन प्रशासकीय अधिकारी किंवा समन्वयक अशा एकूण ५५ जणांची अमेरिका येथील ‘नासा’ संस्थेला भेट आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील तालुका आणि जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत तरतूद करून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
‘शाळांतील व्यवस्था सुधारण्याकडेही लक्ष हवे’
‘राज्यातील विज्ञान प्रदर्शनांना आणि त्यातील प्रकल्पांना तोचतोचपणा आला आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी गुणवत्तेकडे लक्ष द्यायचे राहून गेले आहे. गुणवत्तापूर्ण प्रकल्प फार थोडे असतात. विज्ञान शिक्षकांनी या प्रदर्शनांतील प्रकल्पांमध्ये ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, संशोधनाची जोड द्यायला हवी, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या शासनाच्या स्तरावर भपकेबाजी खूप चालली आहे. विज्ञान संस्थांच्या भेटीतून विद्यार्थी प्रेरणा घेतील, भविष्यात प्रकल्पांची गुणवत्ताही वाढू शकेल. पण, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी शाळेतील व्यवस्था सुधारण्याकडेही लक्ष देण्याची अधिक गरज आहे,’ असे मत शिक्षण अभ्यासक डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
