पुणे : राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ४०५ शासकीय शाळा आता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. तसेच, खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एका आदर्श शाळेत ‘क्रीडा प्रबोधिनी’ निर्माण केली जाणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबतची माहिती दिली. ‘‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या पथदर्शी आराखड्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत निवडलेल्या ४०५ शाळांमध्ये प्रामुख्याने समूह साधन केंद्र शाळा, पीएमश्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नव्या ४०५ शाळांमुळे राज्यातील आदर्श शाळांची व्याप्ती वाढणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमुळे खेळाडू विद्यार्थ्यांना पाठबळ मिळणार आहे,’ असे भुसे यांनी सांगितले.
‘या योजनेत शाळांचे केवळ नूतनीकरण केले जाणार नाही, तर राज्याच्या शैक्षणिक भविष्याचा पाया घातला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत आणि आधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत विनाअडथळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या आणि इतर सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील. शाळांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर या कामांना तातडीने सुरुवात होणार आहे,’ असे भुसे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’
‘विद्यार्थिनींच्या आरोग्याची आणि मासिक पाळीच्या काळातील आरामाच्या सोयीसाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र ‘पिंक रूम’ तयार करण्यात येणार आहे. तसेच, सर्व शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरओ किंवा यूव्ही-यूएफ फिल्टर बसवण्यात येणार आहेत,’ असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
