पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येत गेल्या चार वर्षांत लक्षणीय घट झाली आहे. शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव, मंत्री-अधिकाऱ्यांनी भेटी देण्याचा उत्सव करूनही पटसंख्या वाढ झालेली नाही. चार वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या १ लाख ३७ हजारांनी घटल्याचे शिक्षण विभागाच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २०२३-२४मध्ये पटसंख्येतील घट ६९ हजार ३६६ होती, तर २०२५-२६मध्ये पटसंख्येतील घट २१ हजार २९४पर्यंत कमी झाल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे.
शिक्षण आयुक्तालयानेच या बाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः सीबीएसई, सीआयसीईएसई अशा अन्य शिक्षण मंडळांची संलग्नता घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पाल्याने इंग्रजी माध्यमाच्या, चकचकीत शाळेत शिकावे, अशी अनेक पालकांची आकांक्षा आहे. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश न घेता खासगी शाळांकडे ओढा वाढला आहे. स्वाभाविकपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या घटत आहे. अलीकडेच केंद्र सरकारच्या नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालात दशकभरात बंद झालेल्या शासकीय, अनुदानित शाळांसह कमी होत असलेले प्रवेश ही बाबही अधोरेखित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागानेच जाहीर केलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील प्रवेशाचा घटता टक्का चिंताजनक असल्याचे दिसून येते.
माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले म्हणाले, इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी होत असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसते आहे. कुटुंबनियोजन, कमी झालेला जन्मदर, बेरोजगारीमुळे लग्न न होणे, शिक्षणाचा वाढलेला खर्च अशी अनेक सामाजिक कारणे त्यामागे आहेत. तसेच सरकारी शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन अजूनही सकारात्मक नाही. खाजगी शिक्षणाकडील ओढा कमी झालेला नाही. शिक्षण विभागाची धोरणेही कारणीभूत आहेत. शिक्षकांना शाळाबाह्य कामे, शाळांना पुरेसे शिक्षक न देणे, आधुनिक आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे सरकारी शाळांबाबत नकारात्मक चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता पहिलीची वर्षनिहाय पटसंख्या
२०२२-२३ – ८,१५,००५
२०२३-२४ – ७,४५,६३९
२०२४-२५ – ६,९८,६९३
२०२५-२६ – ६,७७,३९९
सहा जिल्ह्यांत इयत्ता पहिलीच्या पटसंख्येत वाढ
सन २०२५-२६ मध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ या उपक्रमात मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शालेय उपक्रम, शासनाच्या विविध योजना यांचा प्रचार प्रसार केला. त्यामुळे सन २०२५-२६ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने पटसंख्येतील घट कमी झाली. ‘यूडायस’नुसार २०२५-२६ मध्ये सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत इयत्ता पहिलीचा पट वाढला आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
