पुणे : रुबी हाॅल क्लिनिक येथील किडनी रॅकेट प्रकरणाच्या चौकशी समितीचे काम पूर्ण झाले असून, चौकशी अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार डाॅ. मनीषा कायंदे, कृपाल तुमाने यांनी या संदर्भातील मुद्दा विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. रुबी हाॅल क्लिनिकमध्ये सन २०२२ मध्ये झालेल्या किडनी रॅकेटसंदर्भात चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तीन वर्षांचा कालावधी होऊनही अहवाल सादर केलेला नाही. त्याची कारणे काय आहेत, अशी विचारणा कायंदे आणि तुमाने यांनी केली.
आबिटकर म्हणाले, ‘किडनी रॅकेटसंबंधीच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी विस्तृत असल्याने आणि चौकशी, तसेच उलटतपासणी पूर्ण करून अंतिम चौकशी अहवाल तयार करण्यास काही कालावधी लागणार आहे. सद्य:स्थितीमध्ये चौकशी पूर्ण झाली असून, चौकशी अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.’
