पिंपरी : ‘राज्यातील प्रत्येक कामगाराला ‘ईएसआयसी’चा (राज्य कामगार विमा योजना) लाभ मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे ‘नाक’ म्हणजे ‘ईएसआयसी’चे काम आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून काम केल्यास ‘ईएसआयसी’चे देशातील सर्वांत उत्कृष्ट काम महाराष्ट्रात होईल. या रुग्णालयांना आरोग्याची मंदिरे मानून कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने काम करावे,’ असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. राज्यात ‘ईएसआय’ रुग्णालयांचे सक्षम जाळे उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात बुधवारी पार पडला. त्या वेळी आबिटकर बोलत होते. आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त रमेश चव्हाण, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, संचालक सोयम वायाळ, डॉ. अशोक थोरात या वेळी उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांशी करार करून पैसे देण्यापेक्षा सरकारने स्वतःची सुसज्ज रुग्णालये उभारण्यावर भर दिला आहे. रुग्णालयांच्या देयकांचे आकडे पाहून सामान्य नागरिक हवालदिल होतात. त्यांना या चिंतेतून बाहेर काढण्यासाठी ईएसआयसी रुग्णालयांचे जाळे विस्तारले जाईल. यासाठी सुधारित आकृतिबंधाला लवकरच मान्यता दिली जाईल. त्याद्वारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे समूह उपदेशाने केली जाईल.’

‘देशभरातील उत्तम आरोग्य सेवांचा अभ्यास’

‘आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र अव्वलस्थानी राहावा, यासाठी आरोग्य विभागाचा एक विशेष चमू तयार केला जाणार आहे. हा चमू देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्तम उपक्रमांचा अभ्यास करेल आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन सुविधा उभारण्यासाठी शिफारशी करेल. राज्याकडे निधीची कमतरता नाही, फक्त सुनियोजित कामाची जोड हवी,’ असेही आबिटकर म्हणाले.

‘डॉक्टर म्हणजे मंदिरातील देव’ रुग्णालयांची तुलना मंदिरांशी करताना आबिटकर म्हणाले, ‘प्रत्येक ठिकाणी दर्जेदार रुग्णालये बांधली आहेत, ही आरोग्याची मंदिरे आहेत. त्यातील डॉक्टर हे देव आहेत, तर कर्मचाऱ्यांनी भक्त म्हणून आत्मीयतेने रुग्णांची सेवा केली पाहिजे. मला प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना दटावण्याऐवजी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याची संधी मिळावी, असे काम सर्वांनी करावे,’ असे आवाहन प्रकाश आबिटकर यांनी केले.