पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग यांच्यातर्फे २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात ५०० रोजगार मेळावे, कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील सुमारे ६ हजार महाविद्यालये आणि ८४ विद्यापीठांचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. या उपक्रमातून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना विविध उद्योग आणि कंपन्यांशी थेट जोडण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये विविध सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि नामांकित आस्थापना सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्याला केवळ पदवी देण्याबरोबरच रोजगारक्षम करून प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळवून देण्याच्या भूमिकेतून ​उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील १ हजाराहून  अधिक शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहभाग घेतला होता. तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि विभागीय अधिकारी उपक्रमाच्या नियोजनावर देखरेख करत आहेत. तसेच डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पाध्ये, मुंबईतील शासकीय विज्ञान संस्थेतील डॉ. विशाल बाणेवार, एलफिन्स्टन महाविद्यालयातील डॉ. रतन हजारे यांची समन्वय आणि संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.