पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्यात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून चार वर्षांची ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रीसर्च) पदवी अभ्यासक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता असलेल्या महाविद्यालयांना थेट चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम, तर पदव्युत्तरसह पीएचडी संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रीसर्च) अभ्यासक्रम थेट सुरू करता येणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार पदवी अभ्यासक्रमात ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स या चौथ्या वर्षाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या चौथ्या वर्षाबाबत आतापर्यंत मार्गदर्शक सूचनाच नसल्याने महाविद्यालयांच्या स्तरावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चौथ्या वर्षाच्या ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे जाहीर केल्या आहेत. त्यानुसार क्षणिक वर्ष २०२६–२७ पासून चौथ्या वर्षाचा ऑनर्स, संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे.

बिगरव्यावसायिक (नॉन एआयसीटीई) अभ्यासक्रमात चौथ्या वर्षासाठी चार वर्षांची ऑनर्स पदवी, संशोधनासह ऑनर्स हे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध होणार आहेत. ऑनर्स आणि संशोधनासह पदवी या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये मुख्य विषय, बहुविद्याशाखीय दुय्यम विषय, मुक्त निवड विषय, व्यावसायिक व कौशल्यवर्धन अभ्यासक्रम, क्षमता वर्धन अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, सहशैक्षणिक अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग, क्षेत्रीय प्रकल्प, लोकसहभाग प्रकल्प या घटकांचा समावेश असेल. ऑनर्स अभ्यासक्रमाच्या चार वर्षांत एकूण १६०–१७६ श्रेयांक पूर्ण करणाऱ्या, चार श्रेयांकांचे कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पदवी प्रदान केली जाईल. तर संशोधनासह पदवी अभ्यासक्रमासाठी चौथ्या वर्षाच्या मुख्य विषयात १२ श्रेयांकांचा संशोधन प्रकल्प, प्रबंध पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. संबंधित १२ श्रेयांकांची सातव्या, आठव्या सत्रातील विभागणीचा निर्णय संबंधित विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालयाने घ्यायचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठांच्या विभागांना चौथे वर्ष थेट सुरू करता येणार आहे. संलग्न-स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश दिला जाईल. चौथ्या वर्षाची परीक्षा सत्रनिहाय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, सत्र परीक्षेद्वारे घेतली जाईल. या दोन्हीचे प्रमाण विद्यापीठाकडून ठरवण्यात येईल. लॅटरल एंट्रीद्वारे विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागात चौथ्या वर्षात प्रवेश घेता येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या आधीच्या कामगिरीची पडताळणी करून, तसेच श्रेयांक हस्तांतरण, राज्य शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिला जाईल. यूजीसी नियम २०२१ नुसार एका सत्रातील एकूण अभ्यासक्रमापैकी ४० टक्के अभ्यासक्रम स्वयम संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन शिकवता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

पदव्युत्तर, पीएचडी केंद्र नसलेल्या महाविद्यालयात चौथे वर्ष सुरू करण्यासाठीचे पात्रता निकष विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येतील. त्यात ऑनर्स अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मान्यताप्राप्त प्राध्यापक, नॅक दर्जा, संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे, पीएचडी मार्गदर्शक, गेल्या पाच वर्षांतील संशोधन, संशोधन प्रयोगशाळा, उपकरणे, ग्रंथालय, सॉफ्टवेअर, संशोधन संस्था किंवा उद्योग संस्थांशी सहकार्य या घटकांचा समावेश असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘अभियांत्रिकी’मध्ये तीन पर्याय

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मुख्य विषय, दुय्यम विषयाची संकल्पना आणण्यात आली आहे. तसेच, त्यासाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार ‘बीई’, बी. टेक पदवीमध्ये एक मुख्य विषय, एक बहुविद्याशाखीय दुय्यम विषय, दुसऱ्या पर्यायात एक मुख्य विषय, दुहेरी दुय्यम विषय, तर ऑनर्स पदवीसह बहुविद्याशाखीय दुय्यम विषय असा तिसरा पर्याय असणार आहे.

ठळक मार्गदर्शक सूचना

  • चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष कोणत्याही महाविद्यालयाला ‘स्वाभाविक वाढ’ नाही
  • सध्या तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक
  • पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांना चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम थेट सुरू करण्यास, तसेच पदव्युत्तर, पीएचडी संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना थेट संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी
  • केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून इतर महाविद्यालयांमध्ये चौथ्या वर्षात प्रवेशासाठीची व्यवस्था
  • ऑनर्स पदवीचे चौथे वर्ष हे तीन वर्षांच्या पदवीनंतरच्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षास समतुल्य
  • पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात पहिल्या सत्रात संशोधन पद्धती, दुसऱ्या सत्रात ४ श्रेयांकांचे कार्यप्रशिक्षण, दुसऱ्या वर्षात तिसरे आणि चौथे सत्र मिळून १०–१२ श्रेयांकांचा संशोधन प्रकल्प करणे आवश्यक
  • ऑनर्स अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन वर्षांत १२०–१३२ श्रेयांक पूर्ण करणे, संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी १२०–१३२ पूर्ण करून किमान ७.५ सीजीपीए असणे आवश्यक
  • प्रवेशांसाठी महाविद्यालयात मान्यताप्राप्त पीएचडी प्राध्यापक × ५ असे सूत्र – श्रेयांक हस्तांतरण, मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिटसाठी सर्व विद्यार्थ्यांनी ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर नोंदणी करणे आवश्यक