मी जेमतेम ६० टक्क्य़ांनी उत्तीर्ण!

शंभरीत पदार्पण केलेल्या शिवशाहिरांची भावना

शंभरीत पदार्पण केलेल्या शिवशाहिरांची भावना

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयजयकार करतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक तरी गुण अंगी बाणवतो का? शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द कधी मोडला नाही आणि दिलेली वेळ त्यांनी पाळली नाही असे कधी झाले नाही. त्यांच्या या गुणाचे आचरण करता येईल असे मला वाटले. पण, काही वेळा तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला आहे. त्यामुळे यामध्येही मी जेमतेम ६० टक्क्य़ांनी उत्तीर्ण झालो असेच मला वाटते, अशा शब्दांत वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरुवारी प्रांजळ भावना व्यक्त के ली.

गोवा मुक्ती संग्रामातील पराक्रमावर आधारित चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, दत्तोपंत हडप गुरुजी यांनी केलेले मंत्रपठण, नात राधा पुरंदरे-आगाशे आणि पल्लवी जाधव यांनी शंभर दिव्यांनी केलेले औक्षण अशा वातावरणात महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शताब्दी महोत्सव समितीतर्फे पुरंदरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

इंग्लंडमध्ये विंस्टन चर्चिल यांचे मला कोठेही स्मारक दिसले नाही. त्याबद्दल विचारल्यावर, ‘चर्चिल आमच्या रक्तामध्ये असताना स्मारकाची गरजच काय?,’ असा प्रतिप्रश्न मला केला गेला. असे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तामध्ये आहेत का?, असा सवाल पुरंदरे यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराजांचे गुण आवडले म्हणूनच मी आयुष्यभर त्यांचे चरित्र गायले, असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांनी इतिहासाला धक्का लावला नाही

शिवचरित्र अनेकांनी लिहिली, पण शिवचरित्रातून नेमका काय बोध घ्यायचा हे बाबासाहेबांकडून ऐकायला मिळाले. आजच्या जगामध्ये महाराज आपल्याला काय सांगत आहेत, ते बाबासाहेब सांगत आले. आजच्या एखाद्या घटनेबाबत ते ऐतिहासिक संदर्भ सांगतात. प्रत्येक गाठीभेटीवेळी बाबासाहेब इतिहासातील साक्षात्कार घडवतात. बाबासाहेबांशी अनेकदा बोलायला मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांचे अभीष्टचिंतन के ल्यानंतर व्यक्त के ली. बाबासाहेबांची भाषा अलंकारिक आहे, पण अतिरंजित नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून कधीही इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना कधी शिरकाव करू दिला नाही. जे इतिहासाच्या पानांमध्ये आहे, जे खरे आहे ते बाबासाहेबांनी लोकांसमोर ठेवले, असेही ठाकरे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra historian babasaheb purandare turns 100 zws