पुणे पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; आयुक्तांना दिला आदेश

पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करत योग्य ती कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil, Pune Viral Audio Clip, Pune Police Officer
पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करत योग्य ती कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

पुणे पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला बिर्याणीची ऑर्डर देत असून फुकटात आणण्यास सांगत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
गृहमंत्री काय म्हणाले.

“बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे?”; ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ

“या प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असं दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

पुण्यातील निर्बंधाबाबत दोन दिवसांत निर्णय

दरम्यान यावेळी त्यांनी पुणे शहरात लसीकरण कशाप्रकारे वाढवता येईल याबाबत आज चर्चा झाली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिथिलतेबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतील अशी माहिती दिली.

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग सरकारच्या सहमतीनं केलं असं म्हटलं आहे. यावर त्यांनी तत्कालीन की तुमच्या सरकारने असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही. परंतु तो प्रकार आधीच्या काळातील आहे. आताच्या काळातील नाही”.

ऑडिओ क्लिप प्रकरण काय आहे –

पुण पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण झालं आहे –

पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती सांगत कुठे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसंच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो.

यावर महिला अधिकारी बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का पीआयला असं विचारतात. यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. “त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?,” अशी विचारणा महिला अधिकारी करते.

“आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो,” असं पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे? असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असं सांगतो.

“तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते,” असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम. मी सांगतो असं उत्तर देतो.

ऑडिओ क्लिपच्या शेवटी महिला अधिकारी म्हणतात की, “त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra home minister dilip walse patil on viral audio clip of pune police officer sgy