पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षी ९० टक्के ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची चर्चा असते. यंदा बारावीच्या  परीक्षेच्या निकालात राज्यातील ७ हजारांहून अधिक विद्यार्थी गुणवंत ठरले असून, त्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा गुणवंतांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २.९ टक्क्याने निकाल घटला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९४.१४ टक्के, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८४.१४टक्के निकाल लागला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. ९३.२५ टक्के मुली, तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला.

नोंदणी केलेल्या १४ लाख ३३ हजार ४८ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, यंदा ७ हजार ५१० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.२३ हजार ९६४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, ४५ हजार २८६ विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, ६७ हजार ४९१ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले आहेत. ९० हजार १९६ विद्यार्थ्यांना ७० ते ७५ टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या बारावीच्या निकालात ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८४२ने घटली आहे.

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली. विद्यार्थी, पालकांनी कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी निकाल स्वीकारावा. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांंची गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तातडीने करून देण्याबाबत विभागीय मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.