पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत सहा सामूहिक कॉपी प्रकरणांची नोंद झाली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून ३१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात बारावीची परीक्षा तीन हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील जवळपास ९५ टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आहेत. तर, सीसीटीव्ही नसलेल्या १७२ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली केली आहे. बारावीच्या परीक्षेत कॉपी, गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत १०९ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळांतर्गत पाच, तर अमरावती विभागीय मंडळांतर्गत एका परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे.

सामूहिक कॉपी प्रकरणातील सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळांतर्गत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकरणात ७, कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रकरणात १८ कर्मचारी, जालना जिल्ह्यातील रोहिलागड येथील जांबुवंत उच्च माध्यमिक विद्यालय, शहागड येथील प्रबोधनकार ठाकरे उच्च माध्यमिक विद्यालय, अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजीनगर उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रकरणात सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर, अमरावती विभागीय मंडळांतर्गत वाशिम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकरणात २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

सर्वाधिक गैरप्रकार अमरावती मंडळांतर्गत

आतापर्यंत उघडकीस आलेल्या १०९ गैरप्रकारांमध्ये सर्वाधिक ५० गैरप्रकार अमरावती विभागीय मंडळांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. त्या खालोखाल पुणे येथे २७, नागपूर आणि लातूर येथे ११, छत्रपती संभाजीनगर येथे सहा, तर नाशिक येथे चार गैरप्रकार उघडकीस आले आहेत. कोकण, मुंबई आणि कोल्हापूर विभागीय मंडळात आतापर्यंत एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.

उत्तरपत्रिकांची तपासणी

राज्यात बीड (चौसाळा), छत्रपती संभाजीनगर (जैतापूर), वाशिम, जालना येथील सामूहिक कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळात जमा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिकेची तपासणी करण्यात येणार आहे. या उत्तरपत्रिकांमध्ये साम्य आढळल्यास संबंधित विभागीय मंडळाचे अध्यक्ष त्याबाबत पुढील कार्यवाहीबाबतचा निर्णय घेतील, असेही डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.