पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. यंदा बारावीच्या निकालात घट झाल्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असून, पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी बारावीचा टप्पा महत्त्वाचा असतो. बारावी उत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे असतो. त्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशांच्या परीक्षा आणि पुढील प्रवेशप्रक्रिया राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) राबवण्यात येेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या परीक्षा द्याव्या लागतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह खासगी अभिमत विद्यापीठ, खासगी विद्यापीठे प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात.
तर, स्वायत्त महाविद्यालयेही काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांची माहिती घेऊन अर्ज भरून परीक्षा देणे बंधनकारक आहे. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. तर महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पारपंरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवेशप्रक्रियेत संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयांकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर जाहीर झाल्यामुळे आता प्रवेशप्रक्रियाही लवकर सुरू होऊन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
पदवी अभ्यासक्रमांचे नावीन्यपूर्ण पर्याय
पदवीस्तरावर विज्ञान, वाणिज्य, कला या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांशिवाय आता नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत. त्यात लिबरल आर्ट्स, ब्लेंडेड बीएस्सी, विदा विज्ञान, ॲनिमेशन, फॅशन टेक्नॉलॉजी, सिव्हिल सर्व्हिसेस अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा कल लक्षात घेऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो.
एकाचवेळी दोन पदव्या
यूजीसीच्या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पूर्णवेळाचा पदवी अभ्यासक्रम करताना आणखी एक पदवी अभ्यासक्रमही करण्याची मुभा आहे. त्यात विद्यार्थी ऑनलाइन किंवा दूरस्थ अभ्यासक्रमांची निवड करू शकतात. त्याद्वारे पदवीस्तरावरच कौशल्यविकासाचा विचार करून रोजगारक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी पावले टाकू शकतात.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा बारावीचा निकाल कमी झाला असला, तरी पदवी प्रवेशांच्या पात्रता गुणांवर फारसा परिणाम होणार नाही. गेल्या वर्षी सरासरी ९०-९१ टक्के पात्रता गुण आवश्यक होते. काही विषयांचे पात्रता गुण जास्तही होते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे आता प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. काळानुरूप होत असलेले बदल लक्षात घेऊन यंदा काही नवीन अभ्यासक्रम पदवीस्तरावर सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीस्तरावर नवीन पर्याय उपलब्ध होतील. – डॉ. अविनाश मोहरील, प्राचार्य, स. प. महाविद्यालय
यंदा निकालात घट झाली असली, तरी पदवी प्रवेशांच्या पात्रता गुणांवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. मात्र, गुणवंतांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने काही विद्यार्थी विज्ञान पदवी, कला पदवीकडे वळू शकतात. परिणामी, पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये वाढ होऊ शकते. – डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड
