पुणे : राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मात्र, १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेली सर्वाधिक केंद्रे अमरावती विभागात आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी या वेळी उपस्थित होते. दहावी, बारावीच्या परीक्षांवेळी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परीक्षांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समितीची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

डॉ. बेडसे म्हणाले, शिक्षण विभागाने परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही असणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार राज्यातील ९० टक्क्यांहून अधिक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मात्र, १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध नाही. या केंद्रांमध्ये पुणे विभागातील २१, नागपूर विभागातील ९, छत्रपती संभाजीनगर विभागातील ४, कोल्हापूर विभागातील ११, अमरावती विभागातील ५५, नाशिक विभागातील २३, लातूर विभागातील २१, कोकण विभागातील ८, तर मुंबई विभागातील २० केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. तसेच २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत.

भरारी पथकांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळांअंतर्गतही विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेशी निगडित कर्मचाऱ्याकडून गैरप्रकार घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असेही डॉ. बेडसे यांनी नमूद केेले.

सांगली जिल्ह्यात गुगल मीट, झूमचा वापर

जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही ठिकाणी गुगल मीट, झूम अशा प्रणालीचा वापर केला जाणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक नियुक्ती

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारात किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळाकडून १० समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच विभागीय मंडळांकडून जिल्हा स्तरावर प्रत्येकी दोन या प्रमाणे समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत, असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले.