महाराष्ट्र स्टार्टअप नावीन्यता यात्रेअंतर्गत जिल्हा, विभाग स्तर नवकल्पना स्पर्धेचे आयोजन

भागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली.

महाराष्ट्र स्टार्टअप नावीन्यता यात्रेअंतर्गत जिल्हा, विभाग स्तर नवकल्पना स्पर्धेचे आयोजन
image credit: twitter

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रा सुरू करण्यात आली. ३० ऑगस्टपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये यात्रा जाणार आहे. याद्वारे उत्कृष्ट नवकल्पनांच्या सादरीकरण स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील विजेत्याला २५ हजार रुपये, विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकाला विभागाचा स्टार्टअप हिरो पुरस्कार आणि विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेला प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल-लोढा, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आदी उपस्थित होते.

राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नावीन्यपूर्ण संकल्पना यासह कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हॅनवरुन प्रदर्शित केली जाईल. तालुकास्तरीय प्रसिद्धीनंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र होईल. १५ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रामध्ये विभागाच्या विविध योजनांची माहिती, नवउद्यमींच्या प्रवासातील टप्पे याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. दुसऱ्या सत्रात सत्रात १६ सप्टेंबर रोजी सादरीकरण स्पर्धा होईल. जिल्हास्तरीय सादरीकरणातून उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरावर सादरीकरण होणार असून त्यातून निवडलेल्या राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच आवश्यक आर्थिक आणि अन्य पाठबळ पुरवण्यात येईल. जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विनायक मेटे यांच्या मोटारीचा पाठलाग; संशयावरुन एक मोटार चालक ताब्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी