पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षेत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांना आता शिक्षक परीक्षेत (टीईटी-सीटीईटी) उत्तीर्ण असल्याची माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, गुणपडताळणी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ आयोजित करण्यात आली. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी तीन सत्रांत ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेचा निकाल १३ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना केंद्रप्रमुख पदावरील नियुक्तीसाठी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षेत उत्तीर्ण असल्याबाबत सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026info.aspx या दुव्यावर २१ मार्चपर्यंत भरायची आहे. ई-मेल, पत्र किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन परीक्षेतील गुणांची किंवा रिस्पॉन्सशीट उपलब्ध करून घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या दुव्यावर अर्ज करावा लागणार आहे. गुणपडताळणीसाठीचे प्रती पेपर रुपये ५०० रुपये शुल्क भरल्यानंतर १५ दिवसांत उमेदवाराच्या इमेलवर रिस्पॉन्सशीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-मेल, पत्र, किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. या मुदतीनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एकूण ४६ हजार ६८ शिक्षकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तीन सत्रांत झालेली ही परीक्षा ३८ हजार ५५८ शिक्षकांनी दिली. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या गुणयादीनुसार ११८ ते १७१ गुण मिळवलेल्या १५ हजार उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांची (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदे आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील १५१, नाशिक जिल्ह्यातील १२२, रत्नागिरी जिल्ह्यातील १२५, अहिल्यानगर जिल्ह्यातील १२३, रायगड जिल्ह्यातील ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचे या पदभरतीकडे लक्ष लागले आहे.