El Nino Impact on Maharashtra Kharif Season: ‘एल-निनो’मुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता असून, खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात पाच लाख हेक्टरची घट होणार आहे. त्यानुसार राज्याच्या कृषी विभागाने १ लाख ४५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन केले असून, सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस आणि ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

एल-निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धतीचे नियोजन करण्यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नियोजनाबाबतची माहिती दिली. राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते. ‘कमी पावसाच्या शक्यतेनुसार शेतीसाठी पाणी, बी बियाणे, कीटकनाशके यांचे नियोजन करण्यात येत आहे,’ असे भरणे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. या बदलाचा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात दर वर्षी सरासरी दीड लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीची तूट होईल. खरीप हंगामात सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस आणि ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.’

‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, सेंद्रिय खतांचा वापर, तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी महाकृषी ॲपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत,’ असे भरणे यांनी सांगितले.

खतांसाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार

यंदा बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून, २८.०५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच खरीप हंगामासाठी राज्यास ४८.८० लाख टन खतांचा साठा मंजूर असून, आतापर्यंत २५.१७ लाख टन खते उपलब्ध आहेत. खतांच्या आणखी मागणी संदर्भात केंद्र सरकारशी पत्र व्यवहार सुरू आहे.

नुकसानीचे पंचनामे सुरू

नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी २०२५ पासून राज्यातील १३६.२८ लाख शेतकऱ्यांचे १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख १५ हजार हेक्टर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानभरपाई संदर्भातील निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असून, ३० जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. या कर्जमाफीसंदर्भातील शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आणि निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

एल-निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेत, पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वितरक आणि दुकानदारांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री