राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण विभागाने जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यंदा देशभर झालेल्या अवयव प्रत्यारोपणामध्ये सर्वाधिक अवयव प्रत्यारोपण महाराष्ट्र राज्यात झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अवयव प्रत्यारोपण विभाग पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ मध्ये राज्यातील ८८ मेंदूमृत रुग्णांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्यास मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रातून स्थानिक गरजू रुग्णांसह देशाच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांना निरोगी अवयव पाठवणे शक्य झाले. काही वर्षांपूर्वीपर्यंत तमिळनाडू राज्य देशातील अवयवदानात अग्रेसर होते. महाराष्ट्र त्या वेळी दुसऱ्या क्रमांकावरील राज्य होते. गेल्या दोन वर्षांपासून मात्र हे चित्र बदलले असून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी याबाबत माहिती दिली.

आज (शनिवार, २७ नोव्हेंबर) राष्ट्रीय स्तरावर अवयव प्रत्यारोपण दिन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने २०२०-२१ या कालावधीत अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण विभागाने पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रातील ८८ अवयवदात्यांकडून २४४ जणांना अवयवदान करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण विभागाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रमुख आरती गोखले यांनी याबाबत माहिती दिली.

विभागीय पातळीवर पुणे प्रथम

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या चार प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. सलग दोन वर्षे पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने ४१ अवयव दात्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी केले. त्यामुळे मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद अशा विविध ठिकाणी उपचार घेणाऱ्या गरजूंना निरोगी अवयव प्राप्त झाले. त्यामुळे राज्यातील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीसाठी असलेल्या पुरस्कारावर पुणे विभागाने आपले नाव कोरले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra leads in organ transplantation abn
First published on: 27-11-2021 at 01:37 IST