पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनात त्यांचा दरारा होता, विषय समजून घेऊन झपाट्याने निर्णय घेण्याची त्यांची पद्धत, स्वभावात स्पष्टवक्तेपणा होता. त्यांच्या निधनामुळे राज्याने कुशल प्रशासक, ‘टास्कमास्टर’ गमावल्याची भावना आजी-माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनवर पकड असलेले नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख होती. कोणतेही काम सखोलपणे, तपशील समजून घेऊन करण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्याबरोबर काम केलेल्या तीन पिढ्यांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबतच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सकाळी लवकर कामाला सुरुवात करण्यापासून त्यांच्या कामाचा वेग, स्पष्टवक्तेपणा, अधिकाऱ्यांचे म्हणणे समजून घेऊन निर्णय घेणे असे वेगवेगळे पैलू अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.
‘सन २००० मध्ये पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून आजपर्यंत माझा अजितदादांशी सतत संपर्क राहिला. सकाळी सातच्या आत फोन वाजला की तो बहुदा दादांचाच असणार, याची खात्री असायची. एकंदरीत त्यांची प्रतिमा अत्यंत कडक व्यक्ती म्हणून असली, तरी माझे वैयक्तिक अनुभव मात्र नेहमीच सकारात्मक राहिले. गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात वेगवेगळ्या पदांवर काम करताना दादांशी जवळपास वारंवार बोलणे व्हायचे.
इतक्या प्रदीर्घ काळात त्यांनी कधीही कोणतेही चुकीचे किंवा नियमबाह्य काम सांगितल्याचे मला आठवत नाही. उलट, एखाद्या कामातील तांत्रिक गुंतागुंत त्यांना समजावून सांगितली, तर ती शांतपणे ऐकून घेण्याचे आणि वस्तुस्थिती स्वीकारण्याचे मोठेपण त्यांच्याकडे होते. दादांनी आयुष्यातील अनेक चढ-उतार अत्यंत धैर्याने पेलले. त्यांनी प्रशासनावर आपला एक आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. दादांची काम करण्याची शैलीच निराळी होती. ‘खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे’ तोंडावर म्हणण्याचे धाडस त्यांच्यात होते, आणि हेच त्यांचे खरे ‘दादापण’ होते,’ अशी भावना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.
अजित दादांच्या जाण्याने आपण एक सक्षम प्रशासक गमावला आहे. सकाळी ६.३०-७ वाजता डीसीएम बोलणार आहेत असा फोन यायचा. ते आम्ही देत असलेली माहिती शांतपणे ऐकून घेत. कायद्याचे बारकावे त्यांना माहीत असत. विषयाची माहिती नसेल, तर मोघम माहिती द्यायची कोणाचीही हिंमत होत नसे. त्यांच्या बैठकांची तयारी खूप बारकाव्यांनीशी करावी लागे. कामाचा उरक आम्हाला आमच्या कार्यपद्धतीचे पुनरावलोकन करायला भाग पाडत असे. करोना साथीत आधी पुण्यात, नंतर धाराशिवला त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय झाला. ते ‘टास्कमास्टर’ होते. त्यांच्या जाण्याने मोठी प्रशासकीय पोकळी जाणवणार आहे, असे वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर नमूद केले.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी असताना गुटखा, पानमसाला यावर बंदी घालण्याच्या प्रकरणावर काम करत होतो. त्यावर राजकीय नेतृत्त्वाकडूनही पाठिंबा मिळण्याची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची संमती दिली होती. पण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही संमती घ्यायला सांगितली. त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. गुटखा, पानमसाल्याचे दुष्परिणाम, तरुण पिढी, शाळेतील विद्यार्थ्यांकडून होणारे सेवन, विक्रीतून संकलित होणारा कर या बाबत त्यांना माहिती दिली.
केवळ मिनिटभर विचार करून त्यांनी संमती दिली. तो निर्णय खूप मोठा होता. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या राज्यात केवळ दोनच प्रयोगशाळा असल्याने त्येक जिल्ह्यात, किमान प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अजित पवार अर्थमंत्री असताना दिला होता. दुधातील भेसळ वगैरे रोखण्याच्या दृष्टीने त्यांनी लगेचच मंजुरी दिली. पुण्यात महापालिका आयुक्त असताना अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते.
दबावाखाली काही कामे करावी लागतील असे मला वाटले होते. पण चुकीचे सोडाच, पण नेहमीच्याही कोणत्या कामाबाबत त्यांनी कधी संपर्क साधला नाही, अशा आठवणी माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितल्या. ‘विषय समजून घेणे, अधिकाऱ्यांचे म्हणणे समजून घेणे, अधिकाऱ्यांचे म्हणणे योग्य असल्यास त्यांना पाठिंबा देणे, राजकीय तडजोड करावी लागल्यास ती करणे, वेगाने निर्णय घेणे ही त्यांची पद्धत होती. केवळ त्यांच्या दराऱ्यामुळे काही विभागात गैरप्रकार व्हायचे नाहीत. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय हानी होणार आहे,’ असेही झगडे यांनी नमूद केले.
