पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेचा निकाल ५० दिवसांत जाहीर केला. कर्नाटक राज्यात २३ ते २४ एप्रिलला या कालावधीत घेतल्या गेलेल्या सीईटीचा निकाल ६ जून रोजी जाहीर झाला. मग राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाला विलंब का, असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया होत असल्याने हा विलंब निषेधार्ह असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी-सीईटीसह विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यातील काही परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच एमएचटी-सीईटीतील पीसीएम गटाच्या पहिल्या संधीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मात्र, एकूणच सीईटीचा निकाल जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबाच्या अनुषंगाने वेलणकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी सीईटीच्या निकालाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना दिलेल्या दोन संधींपैकी पहिली परीक्षा १० ते २० एप्रिल, तर १२ ते २१ मे या कालावधीत दुसरी परीक्षा झाली. दोन्ही परीक्षा संगणकावर घेण्यात आल्या. राज्य मंडळाने घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख विद्यार्थ्यांनी देऊनही ५० दिवसांत निकाल जाहीर केला गेला. या पार्श्वभूमीवर केवळ सात लाख विद्यार्थ्यांनी संगणकावर दिलेल्या परीक्षेचा निकाल ५० दिवसांत का जाहीर होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.

कर्नाटकात २३ ते २४ एप्रिल दरम्यान झालेल्या सीईटीचा निकाल ६ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सीईटी निकालाची दिरंगाई अक्षम्य आहे. बारावीचा निकाल लवकर लागूनही सीईटीच्या निकालाला होणारा विलंब, पुढील प्रवेशप्रक्रियेमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होण्यास १५ ऑगस्ट उजाडतो, असे वेलणकर यांनी नमूद केले.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकाल लवकर

सीईटी सेलकडून परीक्षा प्रक्रिया, निकालाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. त्यानुसार यंदा सीईटी सेलकडून २० प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. त्यातील तीन परीक्षांसाठी दोन संधी देण्यात आल्या. सर्व परीक्षा २० मे रोजी समाप्त झाल्या. पीसीएम, पीसीबीच्या गटाची परीक्षा अनेक सत्रांत झाली. प्रत्येक सत्रातील प्रश्नसंच, उत्तरतालिका वेगळ्या असतात. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांवर आक्षेपांसाठी वेळ देऊन त्याचे निराकरण केले जाते. निकाल पर्सेंटाइलमध्ये तयार करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी वेळ लागतो. आतापर्यंत सीईटी सेलने २० पैकी १० परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरित निकाल लवकरच जाहीर केला जाईल. सर्व निकाल निर्दोषपणे जाहीर केले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आले आहेत आणि केले जात आहेत.