पुणे : शहरातील रस्त्यांची पावसाने दुरवस्था झाल्याने खड्डे बुजविण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रस्त्यावर उतरले आहेत. कोथरूड मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू करून, या उपक्रमाचा प्रसार-प्रचार होईल, अशीही दक्षता घेतली आहे. एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये सक्रिय झाल्याचा संदेश पाटील यांनी यानिमित्ताने दिला आहे, तर पाटील हे सर्व निवडणुकीसाठीच करत असल्याची टीका विरोधकांकडूनही होत आहे.

हेही वाचा >>> पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणात शस्त्रे पुरविणारा सराइत गजाआड

शहरात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले; तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांबरोबर बैठक आयोजिली होती. त्यानंतरही खड्डे दुरुस्तीची कामे संथ गतीने सुरू असल्याने त्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

पाटील यांनी स्वखर्चाने मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत कोथरूड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. ‘बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, तरकोथरूडमधील ३०० खड्डे बुजवले आहेत,’ असा दावा पाटील यांच्याकडून करण्यात आला. ‘उर्वरित खड्डे लवकरच बुजविण्यात येतील,’ असेही सांगण्यात आले.

हेही वाचा >>> बारामतीमधून उभे न राहिलेलेच बरे! अजित पवार यांचे विधान; ‘तुम्हीच आमदार हवे,’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह

दरम्यान, या उपक्रमावरून विरोधकांनी पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘निवडणुकीसाठी दोन महिने राहिल्याने पाटील यांच्याकडून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही त्यांना चांगले रस्ते देता आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेत सत्ता असतानाही भाजपने केवळ दिखावा केला. त्यामुळेच पाटील यांच्यावर ही वेळ आली,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. दरम्यान, ‘राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकसहभागातून रस्त्यावरचे खड्डे बुजावायला भाग पडले, हे महापालिकेच्या अकार्यक्षमतेचे मोठे उदाहरण आहे. लोकप्रतिनिधींना खड्डे बुजवावे लागणे हे पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेले आहे. प्रशासनाने योग्य वेळी दखल घेतली असती, तर अशी वेळ लोकप्रतिनिधींवर आली नसती,’ असे भाजपचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.