महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत आज चुरशीची लढत होणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. दोन्ही बाजूंकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रत्येक मताचं योग्य गणित बसवण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केलं आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्यानेच पक्ष आदेशानुसार आपण मतदानासाठी जात असल्याचं भाजपाच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> विधानपरिषद निवडणूक: “व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण…”; पुण्यातील आमदारांवरुन सेनेची भाजपावर टीका

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुक्ता टिळक पुण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या. मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असून राज्यसभेच्या मतदानाच्या वेळेसही त्या अशाचप्रकारे सकाळी सकाळी मतदानासाठी मुंबईला आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले,” असं मुक्ता टिळक यांनी सांगितलं. पुढे बोलताना, “पक्षातील सर्वचजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटतं,” असंही त्या म्हणाल्या.


विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर राज्यसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनीही आजारी असताना देखील रुग्णवाहिकेने मुंबईपर्यंतचा प्रवास करुन मतदानाचा हक्क बजावला होता. या दोन मतांमुळे राज्यसभेवर खासदार निवडून गेलेल्या धनंजय महाडिक यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला. आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mlc election bjp mla mukta tilak goes to mumbai for voting svk 88 scsg
First published on: 20-06-2022 at 08:07 IST