पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी

ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मशिदीवरील भोंगे आणि मदरश्यावर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जातं, असंही सय्यद यांनी म्हटलं आहे.

पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी

राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यांनंतर पुणे मनसेमध्ये सध्या खळबळ सुरू आहे. काल पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार काढून घेतला. त्यानंतर आता मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनीही राजीनामा दिला आहे.


आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो,ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतःहा पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे.


वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “बरं पक्षाध्यक्षांच्या भूमिकेला विरोध सोडा साधी नाराजी व्यक्त करायचा अधिकार नसावा? वसंत मोरेंना उभा महाराष्ट्र ओळखतो,काय चुकलं त्यांचं? फक्त पक्षाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली म्हणून त्यांना काय वागणूक दिली गेली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.काय केलं नाही वसंत मोरेंनी पक्षासाठी ते सांगा?जर त्यांच्यासोबत तुम्ही असे वागत असाल तर आमचं तर न बोललेलंच बरं!”


ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मशिदीवरील भोंगे आणि मदरश्यावर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जातं. पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं.म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात होते आणि जीवतोड मेहनत देखील करत होते.पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता.राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळालं!, असंही सय्यद म्हणाले.


मुस्लीम द्वेषाच्या धंद्यांवर भाजपाचं राजकारण चालतं. त्यांना मशिदीच्या भोंग्यापासून त्रास होतो, मदरश्यांना बदनाम करायचं काम त्यांचं आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज पडली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.


एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे.आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारखं आहे.त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पुणे शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.


वसंत मोरेंसोबत जे झालं ते एक कार्यकर्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून देखील अजिबात पटणार नाहीये.फक्त पुणेच नाही तर उभ्या महाराष्ट्राला वसंत मोरेंसोबत झालेल्या प्रकाराचं वाईट वाटलं आहे. वसंत मोरे म्हणजे सर्वसामान्य लोकांचं काम करणारा आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.मात्र त्यांना साधी नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नसावा हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात अझरुद्दीन सय्यद यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2022 at 11:36 IST
Next Story
पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक; पुण्यातील धक्कादायक घटना
Exit mobile version