पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार तयार करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये इयत्ता तिसरी, चौथी, सहावीच्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहेत. मात्र, नव्या पाठ्यपुस्तकांनुसार अध्यापन सुरू करण्यापूर्वी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना २१ दिवसांचा ‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ‘सेतू’ अभ्यासक्रमाची पुस्तके तयार केली आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत राज्यात २०२५-२६ पासून नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. त्यानुसार २०२५-२६मध्ये इयत्ता पहिलीला नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. गेल्या वर्षी पहिलीत असलेल्या विद्यार्थ्यांना नवा अभ्यासक्रम लागू झालेला असल्याने आता इयत्ता दुसरीत गेलेल्या विद्यार्थ्यांना ‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार नाही. मात्र, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांना आता नवा अभ्यासक्रम लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांना संकल्पनांची उजळणी, नव्या अभ्यासक्रमाची तोंडओळख, अपेक्षित क्षमता, अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी सेतू अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्यावर आधी ‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
‘सेतू’ अभ्यासक्रमामध्ये कृती आधारित आणि विद्यार्थिकेंद्रित अध्ययन-अध्यापन पद्धतींचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनांच्या दृढीकरणास मदत होणार असल्याने शिकणे अधिक प्रभावी आणि परिणामकारक होईल. शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती ‘एससीईआरटी’ने दिली.
‘सेतू’ अभ्यास पुस्तकाचे शाळांना वितरण
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘सेतू’ अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘सेतू’ अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेतू अभ्यास पुस्तिका राज्य शैक्षणिक परिषदेच्या http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात सर्वांसाठी खुली करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित ध्येये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी सेतू अभ्यासाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे. २१ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन सुरू करण्यात येईल.-डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)
