पुणे : राज्यभरातील शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी २ (पॅट) परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या वितरणात राज्यभरात पुन्हा गोंधळ झाला आहे. शाळांना विद्यार्थिसंख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिकांचे वितरण झाल्याची शिक्षकांची तक्रार आहे. ‘पॅट’ सुरू झाल्यापासूनच प्रश्नपत्रिकांच्या वितरणामध्ये गोंधळ असल्याचे सातत्याने दिसून आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवी या इयत्तांची ‘पॅट’ परीक्षा ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. त्यात प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयांची परीक्षा आहे. याच कालावधीत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणीही केली जाणार आहे.
‘पॅट’ परीक्षेसाठी शाळांना प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, प्रश्नपत्रिका विद्यार्थिसंख्येपेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत काढण्यास बंदी असल्याने कमी प्रश्नपत्रिका असताना परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
प्रत्येक वर्गातील विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत किमान सात ते आठ प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याची माहिती बीड जिल्ह्यातील एका शाळेच्या शिक्षकाने दिली. नगर जिल्ह्यातील एका शाळेचे शिक्षक म्हणाले, ‘‘पॅट’ परीक्षा सुरू झाल्यापासून कधीही प्रश्नपत्रिका पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत. दुसरी ते चौथीची विद्यार्थिसंख्या २६ आहे, प्रत्येकी तीन विषयांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे ७८ प्रश्नपत्रिका मिळायला हव्या होत्या, पण केवळ ३६ मिळाल्या आहेत.’
प्रशासनाकडून ग्राह्य धरली जाणारी विद्यार्थिसंख्या चुकीची आहे. चालू वर्षाची ‘यूडायस’ प्रणालीवरील विद्यार्थिसंख्या जाहीर करून ती शाळांकडून तपासून घेतल्यास ही तफावत दूर करणे शक्य आहे. मात्र, ही प्रक्रिया केली जात नसल्याने प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थिसंख्या यात तफावत राहते. तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे छायांकित प्रती काढण्यास बंदी असूनही शिक्षकांना नाइलाजाने परीक्षा घेण्यासाठी छायांकित प्रती काढून घ्याव्या लागतात. त्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक
‘यूडायस’वरील शाळांच्या विद्यार्थिसंख्येनुसार प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाते. तसेच, पाच टक्के जास्त प्रश्नपत्रिकाही दिल्या जातात. – डॉ. नंदकुमार बेडसे, प्रभारी संचालक, एससीईआरटी
