पुणे : राज्यात ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत खासगी शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची निवडप्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार असून, संस्थाचालकांना मुलाखतीसाठी केवळ १० गुण देता येणार आहेत.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त अनुराधा ओक, उपायुक्त राजेश शिंदे या वेळी उपस्थित होते.
‘पवित्र पोर्टल’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टीएआयटी) २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शनिवारी (३१ ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खासगी शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी ‘टीएआयटी’ परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी मुलाखतीसह निवड प्रकारासाठी प्राधान्यक्रम निश्चित केले. त्यातून निवडलेल्या ११ हजार ४९३ उमेदवारांनी २७ हजार १५४ प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. एका उमेदवाराची एकापेक्षा जास्त शाळांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना आणि संबंधित व्यवस्थापनांना लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येत आहे. त्याशिवाय उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून आपल्या निवडीची सद्यस्थिती पाहता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
‘पदभरतीतील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांचे काही म्हणणे, मागणी, तक्रारी असल्यास त्यासाठी ‘तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर ७ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा,’ असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले.
आता मुलाखतीला केवळ १० गुण
‘खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी १०० गुणांपैकी ९० गुण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि ‘टीईटी’च्या आधारे स्वयंचलित पद्धतीने निश्चित होणार असून, संस्थाचालकांना मुलाखतीसाठीचे केवळ १० गुण देता येणार आहेत,’ अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
इयत्ता – रिक्त पदे – शिफारस
इयत्ता १ ली ते ५ वी – १,६०९ – ४,४७८
इयत्ता ६ वी ते ८ वी – ४,५०५ – १०,७९२
इयत्ता ९ वी ते १० वी – ४,२१४ – ११,८८४
एकूण – १०,३२८ – २७,९५४
