पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाते. त्या धर्तीवर आता राज्य परीक्षा परिषदेकडूनही वर्षातून दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने सेवेतील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे आता सेवेतील, पदोन्नतीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या टीईटीमध्ये उमेदवारांच्या नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ होऊन ४ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक नोंदणी झाल्याचे दिसून आले होते. या परीक्षेच्या निकालातही यंदा मोठी वाढ झाली. राष्ट्रीय पातळीवर सीबीएसईकडून वर्षातून दोन वेळा सीटीईटी परीक्षा आयोजित केली जात असल्याने राज्यातील उमेदवार, शिक्षकांना संधी मिळण्यासाठी दोन वेळा टीईटी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
टीईटीचे दोन वेळा आयोजन करण्याबाबत डॉ. बेडसे म्हणाले, ‘सेवेतील शिक्षक, उमेदवारांना अधिकाधिक संधी मिळण्यासाठी वर्षातून दोनवेळा टीईटी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.
गुणांमध्ये शिथिलता मिळणार की नाही?
टीईटीमध्ये पात्र होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६० टक्के म्हणजेच ९० गुण, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ५५ टक्के म्हणजे ८३ गुण मिळवणे आवश्यक आहे. सेवेतील शिक्षकांना शाळेत द्यावा लागणारा वेळ, कौटुंबिक समस्या, आरोग्य समस्या असलेल्या शिक्षकांना पात्रता गुणांमध्ये कपात करण्याची मागणी मागणी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींनी केली आहे. मात्र, गुणांमध्ये शिथिलता देण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर प्रकरणातील उमेदवारांचा निकाल राखीव
नोव्हेंबरमध्ये झालेल्या टीईटी परीक्षेवेळी कोल्हापूरमध्ये पेपर फुटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत आले होते. त्या बाबत पोलिसांनी परीक्षा परिषदेत चौकशी केली. मात्र, प्रत्यक्षात पेपर फुटलेला नाही, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले. टीईटी परीक्षा अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली जाते. कमीत कमी हस्तक्षेपामुळे पेपर फुटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, कोल्हापूर प्रकरणातील उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून, त्यांची सुनावणी घेण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.
