विरोधक ब्लॅक फंगस; शिवसैनिकांना सल्ला देताना राऊतांचा विरोधकांवर हल्ला

पुण्यातील कार्यक्रमात विरोधकांना केलं लक्ष्य

sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत. (छायाचित्र/ इंडियन एक्स्प्रेस)

करोनाचं बोट धरून आलेल्या ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसने सर्वांची डोकेुदुखी वाढवली आहे. वेगाने वाढत असलेल्या या आजारावर केंद्रानं चिंता व्यक्त केली असून, साथरोगांच्या कायद्यातही याचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या या ब्लॅक फंगसची (म्युकरमायकोसिस) उपमा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधकांना (भाजप) दिली आहे. पुण्यात करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत शिवसैनिकांना सल्ला दिला.

“करोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. सकारात्मक राहून काम करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी विशेष बालकक्ष आहे. यामध्ये ४० खाटा बालक आणि त्यांच्या पालकांसाठी असलेल्या सेंटरचे उद्घाटन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेनचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, “करोनाच्या महामारीत प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो, की सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करीत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा आहे,” असंही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra politics sanjay raut bjp compare black fungus shivsena bmh 90 svk

ताज्या बातम्या