पुणे : राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याचे चित्र आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्चअखेरीस पूर्ण करण्याचे सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते. ही मुदत उलटून गेली असून, आता जूनअखेरीपर्यंत प्राध्यापक भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे विद्यापीठे, महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामकाजाला फटका बसत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती करण्याची मागणी राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी अनेकदा केली आहे, त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. प्राध्यापक भरती न झाल्याचा फटका विद्यापीठांच्या क्रमवारीवरही झाला आहे. त्याशिवाय, संशोधन कामकाजावरही परिणाम झाला आहे.
त्यामुळे विद्यापीठांना कंत्राटी प्राध्यापक नियुक्त करावे लागत आहेत. तशीच काहीशी परिस्थिती महाविद्यालयांमध्येही आहे. प्राध्यापक भरतीसाठीच्या नियमावलीतील बदलांमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.या पार्श्वभूमीवर, पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, ‘विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या २०-२५ वर्षांतील ही सर्वांत मोठी भरती ठरणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक, तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेण्यात आली. त्यात जूनपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.’
विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, अर्ज दाखल झाले आहेत, छाननी करण्यात आली आहे.
आता मुलाखती आणि नियुक्तीचा टप्पा बाकी आहे. तसेच, महाविद्यालयांमध्ये ५,५०० प्राध्यापक आणि २,९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. त्या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सर्व महाविद्यालयांमध्ये एकूण ५,५०० प्राध्यापकांची भरती केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही पाटील यांनी जूनपर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनीही पदभरतीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, अधिष्ठाता, परीक्षा संचालक ही पदे एप्रिलमध्ये, तर प्राध्यापक भरती जून-जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
.
